एसटी चालकांच्या मनमानीला विद्यार्थी त्रासले

तर नांदगाव वरून एकही एसटी बस जाऊ देणार नाही

संतप्त विद्यार्थ्यांचा एल्गार

एसटी चालकांच्या मनमानीला विद्यार्थी त्रासले

दि 4 मंगेश तायडे/ नांदगाव पेठ

सकाळी एक तास आधी येऊन सुद्धा केवळ एसटी चालकांच्या मनमानी व आगाऊ पणामुळे शेकडो विद्यार्थी दररोज शाळेत उशिरा पोहचत आहे. पिढ्यानपिढ्या तोच संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येत असल्याने मंगळवारी सकाळी संतप्त विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन गाठून एसटी चालकांच्या मनमानीला लगाम घालण्याची विनंती केली अन्यथा शुक्रवार पासून नांदगाव पेठ वरून एकही बस जाऊ देणार नसल्याचा अल्टीमेटम विद्यार्थ्यांनी दिला.

गेल्या पंचवीस वर्षांपासून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत असून दरवर्षी याठिकाणी एक आंदोलन एसटी साठी करावेच लागते.आंदोलना नंतर काही दिवस एसटी बस सुरळीत असते परंतु नंतर पुन्हा त्याच वेदना विद्यार्थ्यांना भोगाव्या लागतात.दररोज सकाळी शेकडो विद्यार्थी नांदगाव पेठ वरून अमरावतीला शिक्षणासाठी येतात मात्र सकाळी एसटी चालक याठिकाणी वाहन थांबवत नाहीत. वरुड डेपो मधील चालकांना तर एवढा माज असतो की एसटी रिकामी असताना सुद्धा विद्यार्थ्यांसमोरून हसत हसत एसटी दामटवतात.विद्यार्थ्यांनी हात दाखविण्याचा तर प्रश्नच येत नाही कारण कित्येक वेळा चालकांनी एसटी अंगावर आणण्याचा सुद्धा प्रयत्न सुद्धा केलेला आहे.

मंगळवारी सकाळी आठ वाजता पासून विद्यार्थी शाळेत जाण्याकरीता उभे असतांना त्यांना दहा वाजेपर्यंत ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी  थेट सरपंच दिगंबर आमले यांच्या घरी मोर्चा वळविला मात्र  सरपंच घरी नसल्याने त्यांनी भाजप चे सचिन इंगळे, अमोल व्यवहारे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तूळे यांच्याशी संपर्क करून त्यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन गाठले.पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी आपली नेहमीप्रमाणे कैफियत मांडली. त्यांना निवेदन सादर केले.भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन यावेळी ठाणेदारांना शुक्रवार पर्यंत अल्टीमेटम दिला अन्यथा नांदगाव पेठ वरून एसटी जाऊ देणार नाही असा दम सुद्धा दिला. पुंडकरांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असले तरी एसटी प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे

करो किंवा मरो शिवाय पर्याय नाही

आजवर गावकऱ्यांनी एसटी साठी अनेक आंदोलने केली. परंतु यावर तात्पुरता मार्ग काढण्यात आला.जिल्हा विकासाच्या वाटेवर असतांना आजही नांदगाव पेठ च्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि एसटी साठी जर संघर्ष करावा लागत असेल तर हे दुर्दैव आहे. एसटी कर्मचारी जर मनमानी करीत असेल आणि त्यामुळे जर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल तर करो किंवा मरो याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.